भाजप-शिवसेना युतीवरून कार्यकर्त्यात चलबिचल, लवकरच निर्णय घेण्याची मागणी

Foto

औरंगाबाद- आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती होते किंवा नाही यावरून सध्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी युतीबाबत लवकर निर्णय घ्यावा असे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांना वाटते. युतीचा निर्णय झाला नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना-भाजपची नेते मंडळी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने युती करून लढल्या होत्या. राज्यातील ४८ लोकसभेच्या जागांपैकी ४२ जागांवर युतीने विजय प्राप्त केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत युतीमध्ये प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले. युती दुभंगली व दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. तेव्हापासून दोन्ही पक्षामध्ये धुसफूस सुरू आहे.  राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी आहे. तरी सुद्धा सेनेकडून भाजपावर त्यांच्या मुखपत्रातून दररोज टीका केली जाते. तसेच गतवर्षी शिवसेनेने यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने युतीबाबत अनेकदा पुढाकार घेऊनही सेनेकडून प्रतिसाद मिळत नाही. ही बाब भाजपच्या लक्षात आली.

 

भाजपने सर्वच्या सर्व ४८ जागांवर निवडणूक तयारी सुरू केली आहे. पण २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाची लाट होती. या लाटेत दोन्ही पक्षांना मोठा विजय मिळाला होता. पण यावेळेचे चित्र वेगळे आहे. यावेळी मोदी लाट नाही. सरकारने केलेल्या कामावर आणि उमेदवाराच्या कर्तृत्वावर उमेदवार निवडून येणार असल्याने युती झाली नाही तर दोन्ही पक्षाचे संख्याबळ घटणार आहे. हे दोन्ही पक्षातील नेते मंडळीला चांगले ठाऊक आहे. भाजप अजूनही सेनेसोबत युती होण्याबाबत आशावादी आहे. शिवसेना युती करेल या आशेवर भाजपची मंडळी असल्याने शिवसेनेचे खासदार निवडून आलेल्या जागांवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणूक तयारी सुरू केलेली आहे. तसेच काही जणांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत तसेच जे इच्छुक आहे अशी मंडळीने मतदार संघात जनसंपर्क सुरू केला आहे. मतदार संघात गाठी-भेटी घेणे सुरू केले आहे. पण युतीबाबत अद्याप धोरण निश्‍चित नसल्याने मतदार संघात प्रचार कसा काय करायचा असा प्रश्‍न भाजपच्या आणि सेनेच्या इच्छुकांपुढे पडला आहे. यामुळे युतीचा निर्णय दोन्ही पक्षातील नेत्यांनी लवकर घेतल्यास पक्ष बांधणीच्या कामाला जोर येईल, असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटते. 

 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker